आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी यमुना नदीकाठी सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रकरणात पर्यावरण परवाने न घेतल्याने त्यांना ठोठावलेला पाच कोटींचा दंड भरण्यास नकार देऊन औद्धत्य प्रकट केले आहे, अशा शब्दांत राज्यसभेत विरोधकांनी चिंता व्यक्त केली.
जनता दल संयुक्तचे नेते शरद यादव यांनी हा प्रश्न उपस्थित करताना सांगितले, की रविशंकर यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशास आव्हान देण्याचा इरादा व्यक्त केला आहे व दंड भरण्यास नकार दिला आहे, ही गंभीर बाब आहे. त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, पण एनडीए सरकार त्यांच्या बाजूने आहे. किमान ३५ लाख लोक कार्यक्रमास येणार आहेत व त्यामुळे सुरक्षेचाही प्रश्न आहे. काँग्रेस, डावे व समाजवादी पक्षाचे इतर सदस्या यांनी शरद यादव यांच्या म्हणण्यास पािठबा दिला. जयराम रमेश यांनी या सांस्कृतिक महोत्सवाने पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याचे सांगितले. राष्ट्रकुल खेळांच्या वेळी तसेच अक्षरधाम मंदिरामुळे यमुनेच्या पूर पठारांचे आधीच नुकसान झाले आहे, त्यात आता ही भर पडल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी सांगितले, की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे विरोधक यावर नोटीस देऊ शकत नाहीत.