करोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं थांबवल्यानंतर आता देशांतर्गत विमान सेवा देखील खंडीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयानुसार, २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ही सेवा बंद राहणार आहे. यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

या परिपत्रकानुसार, देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी विमान सेवा २४ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवशी सर्व विमान कंपन्यांना त्यांचे देशातील प्रवाशी निश्चित ठिकाणी रात्री बारा वाजण्याआगोदरच उतरावे लागतील.

दरम्यान, प्रवासी विमानांची उड्डाण थांबणार असली तरी मालवाहतुकीच्या विमान उड्डाणांना हा आदेश लागू नसेल. त्यामुळे या विमानांची उड्डाणे नेहमीप्रमाणेच सुरु राहतील.

खबरदारीचा उपाय म्हणून भारताने एका आठवड्यापूर्वीच अर्थात २२ मार्चपासूनच आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं बंद केली आहेत.