देशातल्या अनेक ठिकाणी सध्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजार बळावत चालला आहे. करोनातून बरे झालेल्या किंवा बरे होत असणाऱ्या रुग्णांना हा आजार होत असल्याचं कळत आहे. या आजाराच्या उपचारासाठी सध्या ‘अॅम्फोटेरीसीन-बी’ हे औषध डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमधून या औषधाची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन आता भारत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या औषधाची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने या औषधाच्या आयातीवर आणि देशातली निर्मिती वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातले आयातदार आणि औषध उत्पादकांसोबत चर्चा करुन या औषधाच्या साठ्याचा आणि मागणीचा काल आढावा घेण्यात आला. यावेळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांची मागणी लक्षात घेऊन १० मेपासून ३१ मेपर्यंत औषधांचा पुरवठा केला जाईल. राज्यांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयातल्या ह्या औषधाच्या वाटपासाठी यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर ही औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी एककेंद्री संपर्क व्यवस्था उभारण्याचीही राज्यांची मागणी आहे.

करोनाची लागण झालेल्या रुग्णांतील प्रतिकारशक्ती कमी होते. त्यातच रुग्णांना मधुमेह किंवा मूत्रपिंडाशी संबंधित आजार असतील तर त्यांना म्युकरमायकोसिसची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या आजारात नाकाच्या बाजूला असलेल्या हाडाच्या मोकळ्या जागेत (सायनस) या बुरशीची वाढ होते व त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असेल तर ही बुरशी वेगाने वाढते व पुढे रक्तवाहिन्यांमध्ये शिरून रक्तप्रवाहात अडथळा आणते. करोनाच्या पहिल्या लाटेवेळी या आजाराबाबतची माहिती समोर आली होती. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराने अनेकांची दृष्टीच हिरावून घेतली आहे. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.