जम्मू : आपण तालिबानला दहशतवादी संघटना मानतो की नाही हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे, असा प्रश्न भारताने तालिबानशी अधिकृतरीत्या चर्चा केल्याच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विचारला.

‘एकतर तालिबान ही दहशतवादी संघटना आहे किंवा ती नाही. तुम्ही (केंद्र सरकार) तिला काय मानता हे कृपया स्पष्ट करा,’ असे ओमर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  ‘तालिबान ही दहशतवादी संघटना नसेल, तर तिला दहशतवाद्यांच्या यादीतून काढून टाकण्यासाठी तुम्ही संयुक्त राष्ट्रांत जाल काय? सध्या तुम्ही (भारत) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहात,’ असे अब्दुल्ला म्हणाले. तालिबान ही दहशतवादी संघटना असेल, तर सरकारने तिच्याशी चर्चा का केली, असेही त्यांनी विचारले.