लग्नसमारंभांमध्ये अन्नपदार्थ वाया घालवणाऱ्यांना या पुढे सरकारकडून मोठा दंड ठोठावला जाणार आहे. मोठ्या कार्यक्रमांमध्ये अन्न पदार्थ कचऱ्यात टाकणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि सभागृहांना या पुढे पाच लाखांपर्यंतचा दंड केला जाणार आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) यासंदर्भात नवीन नियम तयार केले असून ते मंजूरीसाठी केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहेत.

का तयार केले जात आहेत हा नियम?

हॉटेल, रेस्टॉरंट आणि सभागृहांमध्ये होणाऱ्या मोठ्या लग्न समारंभांमध्ये अनेकदा जेवण वाया जाते. अनेकदा या उरलेल्या अन्नपदार्थांचे काय करावे याबद्दलची माहिती नसते आणि ते कचऱ्यात फेकून दिले जाते. काही ठिकाणी याबद्दल जागृती झाल्याचे दिसत असून उरलेल्या अन्नपदार्थांचे गरिबांमध्ये वाटप केले जाते. मात्र बहुतांश वेळा हे अन्न कचऱ्यात फेकून दिले जाते. म्हणूनच आता एफएसएसएआयने मोठ्या कार्यक्रमांमध्ये उरलेल्या अन्नपदार्थांचे काय करावे यासंदर्भात नियमावली तयार केली आहे.

उरलेल्या खाण्याच्या दर्जाबद्दलही नियम

सरकारशी संबंधित अनेक स्वयंसेवी संस्था हॉटेल, रेस्टॉरंट आणि सभागृहे कार्यक्रमानंतर उरलेले अन्नपदार्थ गरिबांमध्ये वाटण्याचे काम करतात. मात्र वाटप करण्यात येणाऱ्या या अन्नाच्या दर्जाबद्दल कोणतेही नियम सध्या नाहीत. उरलेल्या अन्नपदार्थांसंदर्भातही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या अन्नपदार्थांमुळे विषबाधा होण्याची शक्यता कमी होणार आहे.

नोंदणी करणे गरजेचे

नवीन नियमांनुसार हॉटेल, रेस्टॉरंट आणि सभागृहांच्या संचालकांना एफएसएसएआयच्या वेबसाईटवर नाव नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. तसेच उरलेल्या अन्नपदार्थांचे वाटप करणाऱ्या सेवाभावी संस्थांची अधिकृत नोंद केली जाणार आहे. या नवीन नियमांनुसार सर्व राज्यांमध्ये खाद्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात येईल. ही समिती दान म्हणून देण्यात आलेल्या अन्न पदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवेल. तसेच दान करण्यात येणाऱ्या अन्नासंदर्भात वेगवेगळे सल्ले ही समिती वेळोवेळी खाद्य आयुक्तांना देईल. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार मोठ्या कार्यक्रमांमध्ये अनेक किलो अन्न वाया जाते.

काय असतील नियम

१)
समारंभांनंतर उरलेल्या अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबद्दल विशेष लक्ष ठेवले जाईल

२)
उरलेले पादर्थ पॅकेट फूड असले तर त्यावर सील बंद लेबल असणे बंधनकारक असणार आहे

३)
खाण्याच्या डब्ब्यांवर एक्सपायरी डेट, पदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी यासारखी माहिती देणे बंधककार असणार आहे.

४)
दान देणाऱ्या आणि घेणाऱ्या संस्थांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांचा तपशील नोंदवणे बंधनकारक असणार आहे.

५)
उरलेले अन्नपदार्थ स्वच्छ जागी सात डिग्री तापमानात साठवून ठेवणे सभागृहांना आणि आयोजकांना बंधनकारक असणार आहे.