केंद्र सरकारने नोटबंदीच्या निर्णय घेण्यामागचे कारण आता समोर आले आहे. देशभरातील बनावट नोटासंदर्भात भारतीय सांख्यिकी संस्थेसह अन्य सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या सखोल अभ्यासानंतर सरकारने पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान या संस्थांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर करण्यात आला होता. यामध्ये देशभरात तब्बल ४०० कोटी रुपयांच्या बनावट नोटा चलनात असल्याचे उघड झाले आणि म्हणूनच मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतला.

इकॉनॉमिक टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये एक अहवाल सादर करण्यात आला. देशभरातील सुरक्षा यंत्रणा आणि सांख्यिकी विभागाने बनावट नोटासंदर्भात अहवाल तयार केला होता. या अहवालात गेल्या चार वर्षात म्हणजेच २०११ – १२ ते २०१४ – १५ या कालावधीत बनावट नोटांचे प्रमाण तेवढेच होते असे म्हटले होते. बनावट नोटांमध्ये पाचशेपेक्षा हजारच्या नोटांचे प्रमाण कमी होते. हजार आणि शंभरच्या बनावट नोटांचे प्रमाण सारखेच होते. पण केंद्र सरकारने शंभरऐवजी हजारच्या नोटाच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्तात म्हटले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सांख्यिकी विभागाने तयार केलेला हा अहवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे सादर कऱण्यात आला. डोवाल यांनी अधिका-यांसोबत काही आठवडे चर्चा केली आणि या चर्चेअंती बनावट नोटांविरोधात कठोर पावले उचलण्याचा ठरले. आरबीआयच्या अधिका-यांनी पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्यावर भर दिल्याने सरकारची या निर्णयाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.
कॅनडा, ब्रिटन, मॅक्सिको या देशांच्या तुलनेत भारतात बनावट नोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात प्रति १० लाख रुपयांमागे अडीचशे रुपयांच्या बनावट नोटा असतात असा अंदाज आहे. भारतात दरवर्षी ७० लाख रुपयांच्या बनवाट नोटा चलनात आणल्या जातात. यातील निम्म्या नोटाही पकडल्या जात नाही. देशातील ८० टक्के बनावट नोटा या एचडीएफसी, अॅक्सिस आणि आयसीआयसीआय या बँकेने पकडल्या आहेत.