राफेल विमान खरेदीप्रकरणी केंद्र सरकारने भ्रष्टाचार रोखणाऱ्या काही नियमांमध्ये बदल करुन ते काढून टाकले आहेत, असा दावा ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या वृत्ताद्वारे केला आहे. या वृत्ताचा दाखला देताना काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. असे करुन मोदी कोणता भ्रष्टाचार लपवू पाहत आहेत? असे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणााला आता नवे वळण मिळाले आहे.
संबंधित वृत्तात म्हटले आहे की, राफेल करारावर सह्या करण्यापूर्वी काही दिवस आधी खरेदी प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आले. त्यामध्ये भ्रष्टाचारविरोधी काही प्रमुख नियमांना हटवण्यात आले होते.
या वृत्ताचा दाखला देताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला. राहुल म्हणाले, मोदींनी लूटमार केली आहे. प्रत्येक संरक्षण करारात भ्रष्टाचारविरोधी कलमे असतात. ‘द हिंदू’ या वर्तमानपत्राने वृत्त दिले आहे की, राफेल करारातील अशा भ्रष्टाचारविरोधी कलमांना हटवण्यात आले आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, पतंप्रधानांनी भ्रष्टाचाराला साथ दिली आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील हिंदूची बातमी ट्विटरवरुन शेअर करीत मोदींना काही प्रश्न विचारले आहेत. राफेल करारात सॉवरन गॅरंटी माफ केल्यानंतर तुम्ही भ्रष्टाचारविरोधी कलमांमध्येही सूट दिली आहे. शेवटी आपण कुठला भ्रष्टाचार लपवू पाहत आहात? असा सवालही त्यांनी केला आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले, सरकारने कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा जस्त वेगाने राफेल करारातील बाबी उघड होत आहेत. सुरुवातीला किंमत वाढवण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने समांतर चर्चेद्वारे भारतीय वार्ता दलाच्या प्रयत्नांना निष्प्रभ्र केले. त्यानंतर मानक संरक्षण खरेदी प्रक्रियेत बदल केले गेले. त्यांनी हा देखील आरोप केला की, दसॉला या करारात फायदाच फायदा झाला आहे.
First Published on February 11, 2019 2:54 pm