सीमा रेषेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरु असतानाच केंद्र सरकारने आता सीमेवर राहणाऱ्या नागरिकांसाठी बंकर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू- काश्मीरमधील सांबा, पुँछ, जम्मू, कठूआ आणि राजौरी या पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास १३ हजार बंकर बांधले जाणार आहेत. याशिवाय या जिल्ह्यात १, ४३१ मोठे बंकर (कम्यूनिटी बंकर) देखील बांधले जाणार असून एका बंकरमध्ये किमान ४० लोकं राहू शकतील.

केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनला (एनबीसीसी) जम्मू- काश्मीरमधील सीमेवर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सीमेपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांसाठी बंकर बांधण्याचे काम एनबीसीसीला देण्यात आले आहे. १६० चौरस फुटाच्या खासगी बंकरमध्ये ८ ते १० लोकं राहू शकतील. याशिवाय एका कम्यूनिटी बंकरमध्ये ४० जणांना राहता येणार आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात भारतीय सैन्याचे १५ जवान, तर सीमा सुरक्षा दलाचे ४ जवान शहीद झाले. याशिवाय १२ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ७९ जण यात जखमी झाले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने बंकर बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने एनबीसीसीला हे काम दिले असून या कामासाठी ४१६ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहेत. बंकरमध्ये नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेतली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुठे किती बंकर?
सांबामध्ये २,५१४ बंकर बांधले जाणार आहे. या भागात ८ कम्यूनिटी बंकरही बांधले जातील. जम्मूत १,२०० खासगी आणि १२० कम्यूनिटी बंकर बांधले जातील. राजौरीत ४, ९१८ खासगी आणि ३७२ कम्यूनिटी बंकर बांधले जातील. कठूआ येथे ३, ०७६ तर पूँछमध्ये १,३२० खासगी बंकर बांधले जातील. पूँछमध्येच ६८८ कम्यूनिटी बंकर देखील असतात. सीमेवर देशासाठी काम करायची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्यासाठी हे आव्हानात्मक काम आहे, असे एनबीसीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.