News Flash

सोशल मीडियावर ‘श्रीमंती’ दाखवताय? सरकार नजर ठेवणार

उत्पन्न आणि खर्चाची पडताळणी होणार

प्रातिनिधीक छायाचित्र

नवीन घर, नवीन गाडी, नवा महागडा मोबाईल घेतल्यावर त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. काही नवी खरेदी केल्यावर त्या वस्तूचा फोटो फेसबुक, इन्स्टाग्रामवर टाकणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. अशा फोटोंमुळे मित्र परिवार तुमचे कौतुक करत असेल. मात्र आता यापुढे असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यास आयकर विभागाचे अधिकारी तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतात. कारण आयकर विभाग तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरदेखील नजर ठेवणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दाखवली जाणारी ‘श्रीमंती’ अनेकांना महागात पडू शकते.

केंद्र सरकार ऑगस्ट २०१७ पासून फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्यासारख्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर करडी नजर ठेवणार आहे. तुमचा खर्च तुमच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत जास्त आहे का, याची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकार हे पाऊल उचलणार आहे. याबद्दलचे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे. तुमचे बँक अकाऊंट, एकूण संपत्ती आणि सोशल मीडियावरील लाईफस्टाईल यांची पडताळणी सरकारकडून केली जाणार आहे. या माध्यमातून उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसतो का, याचा तपास सरकारकडून केला जाईल.

जास्तीत जास्त लोकांना कर व्यवस्थेच्या रचनेत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे. यामुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना घरांवर आणि कार्यालयांवर धाडी न टाकताही करचोरी करणाऱ्यांची माहिती मिळणार आहे. करचोरी रोखण्यासाठी सध्या केंद्र सरकारकडून विविध मार्गांचा वापर केला जातो आहे. यासाठी नवी यंत्रणा वापरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. सध्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केला जाणारा खर्च, संपत्ती, शेअर बाजारातील गुंतवणूक, रोख रकमेच्या माध्यमातून केली जाणारी खरेदी, बँक खात्यातील शिल्लक यांची माहिती सरकारकडे उपलब्ध आहे. करचोरी रोखण्यासाठी यापुढे या माहितीसह सोशल मीडियावरील माहितीचादेखील उपयोग करण्यात येणार आहे. यामध्ये काही संशयास्पद आढळल्यास त्याबद्दलच्या सूचना पत्र किंवा ई-मेलच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला देण्यात येणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2017 8:26 pm

Web Title: government will check social media accounts like facebook instagram for income tax
टॅग : Income Tax,Social Media
Next Stories
1 ‘मनरेगा’अंतर्गत ५.१२ कोटी रोजगार प्रदान; नरेंद्र सिंह तोमर यांची राज्यसभेत माहिती
2 ‘राज्य सरकारं ऐकत नाहीत, मग पंतप्रधानांनी सैन्य पाठवायचं का?’
3 गुजरात दौऱ्यावर स्मृती इराणी, होडीत बसून पूरग्रस्त भागाची पाहणी
Just Now!
X