केंद्र सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा काढून घेतली आहे. मनमोहन सिंग यांना यापुढे झेड प्लस सुरक्षा कायम असेल. देशाचे माजी पंतप्रधान असल्याने मनमोहन सिंग यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे सुरक्षा कवच होते. एखाद्या व्यक्तीला कितपत धोका आहे त्याआधारावर सुरक्षा ठरवली जाते. सुरक्षा यंत्रणांकडून नियमित आढावा घेऊन सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल केले जात असतात असे केंद्रीय गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

मनमोहन सिंग यांचे एसपीजी सुरक्षा कवच हटवण्याच्या निर्णयावरुन वाद होऊ शकतो. मनमोहन सिंग यांनी २३ ऑगस्टला सहाव्यांदा राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.

मनमोहन सिंग यांची राजस्थानातून राज्यसभेवर निवड झाली आहे. भाजपाने मनमोहन सिंग यांच्याविरोधात उमेदवार उभा न केल्याने त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. यापूर्वी मनमोहन सिंग यांनी २८ वर्ष राज्यसभेमध्ये आसामचे प्रतिनिधीत्व केले.