काँग्रेस-जेडीएसने आवश्यक संख्याबळाच्या आधारे सर्वप्रथम सत्तास्थापनेचा दावा केलेला असतानाही कर्नाटकच्या राज्यापालांनी भाजपाला बहुमतासाठी १५ दिवसांची मुदत देऊन घोडेबाजाराला प्रोत्साहन दिले आहे, असा आरोप जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपालांचा हा निर्णय असंवैधानिक आहे. त्यामुळे आम्ही आता भविष्यात काय करता येईल याबाबत रणनिती आखणार आहोत, असेही कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.


भाजपाने कर्नाटकच्या निवडणुकीत १०४ जागा जिंकल्या तर अपक्षांनी केवळ २ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे अपक्ष भाजपासोबत गेले तरी ते बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे ते बहुमत कसे सिद्द करु शकतील? असा सवाल जेडीएस आणि काँग्रेसचे वकिल जावेद यांनी केला आहे. मात्र, बहुमतासाठी भाजपाला काँग्रेस-जेडीएसचे आमदार फोडल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी भाजपा आपल्या ताकदीचा वापर तसेच आमदारांना खरेदी करण्याचाही प्रयत्न करतील. मात्र, आमचे संख्याबळ होत असल्याने राज्यपालांनी आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी जेडीएस आणि काँग्रेसचे वकिल अॅड. जावेद यांनी केली आहे.