राजस्थानातील सत्ता संघर्ष आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट या दोन टोकांवरून गेहलोत विरुद्ध राज्यपाल असा सरकल्याचं दिसत आहे. शुक्रवारी याचं दिशेनं अनेक घडामोडी घडल्या आणि वक्तव्येही झडली. विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यावरून आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री गेहलोत यांनी एक विधान राजभवनासंदर्भात केलं होतं. त्या विधानावरून राज्यपाल कलराज मिश्र यांनी गेहलोत यांना पत्र लिहून चांगलंच फटकारलं आहे.

सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना बजावलेल्या नोटीसीला राजस्थान उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. राज्यपालांनी अधिवेशन बोलवण्याची मागणी फेटाळल्यानंतर गेहलोत यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गेहलोत यांनी ‘राजस्थानातील जनतेनं राजभवनाला घेराव घातल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही,’ असं विधान केलं होतं. तसेच त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी राजभवन परिसरातच अधिवेशनाच्या मागणीसाठी निदर्शनं सुरू केली.

दिवसभर झालेल्या या राजकीय घडामोडींनंतर राज्यपाल कलराज मिश्र यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून सुनावलं आहे. “विधानसभेच्या अधिवेशनाबाबत मी तज्ज्ञांशी चर्चा करण्यापूर्वी तुम्ही जाहीरपणे असं म्हणालात की, ‘राजभवनाला घेराव घातला, तर आमची जबाबदारी नसेल. तुम्ही आणि तुमचे गृह मंत्रालय राजभवनाचे संरक्षण करू शकत नसाल, तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचं काय? राज्यपालांच्या सुरक्षेसाठी कोणत्या सुरक्षा यंत्रणेशी संपर्क करायचा? कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या तोंडून मी अशा पद्धतीचं विधान कधीच ऐकलं नाही. ही चुकीच्या पायंड्याची सुरूवात नाहीये का, जिथे आमदार राजभवनात निदर्शनं करत आहेत,” अशा शब्दात राज्यपालांनी गेहलोत यांना सुनावलं आहे.

गेहलोत नेमकं काय म्हणाले होते?

“करोना तसंच राज्यातील राजकीय परिस्थितीसंबंधी चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलावलं जावं अशी आमची मागणी आहे. आम्हाला वाटतं काही दबाव असल्याने राज्यपाल अधिवेशन बोलावण्यासंबंधी कोणताही आदेश देत नाहीयेत. पण, उद्या जनतेने राजभवनला घेराव घातला तर जबाबदारी आमची नाही,” असं पत्रकार परिषदेत बोलताना गेहलोत म्हणाले होते.