जम्मू व काश्मीर विधानसभेत त्रिशंकू स्थिती अस्तित्वात आल्यानंतर आता कोणताच पक्ष बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी काळजीवाहू मुख्यमंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी केल्याचा अहवाल राज्यपाल एन.एन.वोरा यांनी राष्ट्रपतींकडे पाठवला. त्यांनतर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल लागवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिलेल्या अहवालात दोन ते तीन पर्याय नमूद करण्यात आले होते. यामध्ये कोणत्याही पक्षाने बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापनेचा दावा अजूनपर्यंत केलेला नसल्याने जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्याचे सुचविण्यात आले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.  
२० डिसेंबर रोजी झालेल्या जम्मू-काश्मीर निवडणुक निकालांमध्ये पीडीपी पक्ष २८ जागांवर विजयी होऊन सर्वात मोठा पक्ष ठरला तर, त्यापाठोपाठ भाजपला २५ जागांवर यश मिळाले. नॅशनल कॉन्फ्रेन्सला १५ तर, काँग्रेसला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात त्रिशंकू स्थिती अस्तित्वात आली आणि सत्तास्थापनेच तिढा अद्यापही सूटलेला नाही.