देशात करोना संसर्गाचा दिवसेंदिवस उद्रेक होताना दिसत आहे. दररोज लाखांच्या संख्येने करोनाबाधित वाढत आहेत. शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. परिणामी आरोग्ययंत्रणा कोलमडत असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत देखील लस तुटवड्यामुळे काहीसे अडथळे येताना दिसून येत आहेत. दरम्यान, जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोविड-19 विषाणूवरील लशींची किंमत भारतात अधिक असल्याचे दिसून आले आहे. इतर देशांत लशींच्या किमती खुल्या बाजारात फार जास्त दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने सीरम व भारत बायोटेकला लसीची किंमत कमी करण्याच आवाहन केलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने या संदर्भात ट्विट केलं आहे.

स्वदेशी लस असलेल्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे दर राज्यांना ६०० रुपये व खासगी रुग्णालयांना १२०० रुपये असे लावण्यात आले आहेत, तर सीरम इन्स्टिट्यूटने त्यांच्या कोव्हिशिल्ड लशीचे दर राज्यांना ४०० रुपये व खासगी रुग्णालयांना ६०० रुपये इतके जाहीर केले आहेत. पण दोन्ही लशीतील किमतीचा फरक कशामुळे याचे स्पष्टीकरण अद्याप झालेले नाही.

भारतामध्ये लशींच्या किमती तुलनेत अधिक

किंबहुना काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी या किमतीतील फरकाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भारत बायोटेक व सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन्ही संस्थांनी लशींच्या वाढीव किमतीचे समर्थन केले आहे.

लशीची भारतातील किंमत व इतर देशातील लशींच्या किमती यांची तुलना करणे अन्याय्यपणाचे होईल असे मत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केले होते. भारत बायोटेकने किमतीचे स्पष्टपणे समर्थन केले नसले तरी खर्च भरून निघण्यासाठी एवढी किंमत ठेवल्याचे म्हटले आहे.

वाढीव लसमूल्याचे ‘सीरम’कडून समर्थन

कोव्हिशील्ड लशीची आधीची किंमत ‘अ‍ॅडव्हान्स्ड फंडिंग’वर आधारित होती व आता आपल्याला लशीचे उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे असे सांगून, या लशीची किंमत आधीच्या किमतीपेक्षा दीडपट ठेवण्याचे देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या करोना प्रतिबंधक लशीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने समर्थन केले आहे.