पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सार्क परिषदेच्या वेळी हस्तांदोलन केले असले तरी ते पुरेसे नाही, मनाने एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
राजनाथ सिंह हे मोदी यांचे समर्थक मानले जात असले तरी उभय नेत्यांमध्ये तणाव असल्याचीही चर्चा अधेमधे रंगते. त्यामुळेच या हस्तांदोलनाबाबत राजनाथ यांनी लावलेला वेगळा सूर सूचक आहे.
विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजनाथ सिंह काश्मिरात आले आहेत. त्यांनी उरी, कुपवाडा आणि पहलगाममधील लोकांसाठी शहरातील विमानतळावरून दूरध्वनीवरून सभा संबोधित केली. खराब हवामानामुळे ते तेथे पोहोचू शकले नाहीत.

आत्मसन्मानाशी तडजोड नाही – शरीफ
पाकिस्तानचा सन्मान, स्वाभिमान आणि कीर्तीशी तडजोड करून भारतासमवेत चर्चा केली जाणार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी स्पष्ट केले आहे.
नेपाळमधील सार्क परिषद आटोपून मायदेशी परतताना शरीफ यांनी विमानात वार्ताहरांशी संवाद साधला. भारतासमवेत केवळ चर्चेसाठी चर्चा केली जाणार नाही, असे ते म्हणाले.
उभय देशांत तणाव असताना आपण मोदी यांच्याशी हस्तांदोलन कसे केलेत, या प्रश्नावर शरीफ उत्तरले की, उभय देशांत सचिव पातळीवरील चर्चा रद्द झाली असली तरी आम्ही एकमेकांची विचारपूस करू शकतो! तेवढय़ापुरतेच ते हस्तांदोलन होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी काश्मिरी नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रकार नवीन नाही, याआधीही अशी चर्चा अनेकदा झाली आहे. त्यामुळे परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा भारताने थांबवावयास नको होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. काश्मीरसह सर्व वादग्रस्त प्रश्नांवर आम्हाला सर्वमान्य तोडगा काढण्याची इच्छा आहे. त्यामुळे सन्मानाने चर्चा पुढे ठेवण्याचा आमचा मानस आहे, असेही शरीफ म्हणाले.

पाकिस्तानच्या माध्यमांकडून मात्र ठळक प्रसिद्धी
नेपाळमधील सार्क परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्या प्रसंगाला पाकिस्तानातील प्रसिद्धीमाध्यमांनी ठळकपणे प्रसिद्धी दिली आहे. पाकिस्तानातील सर्व अग्रगण्य वृत्तपत्रांनी मोदी आणि शरीफ यांनी केलेले हस्तांदोलन आणि चर्चा याला छायाचित्रासह पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्धी दिली आहे. सार्क परिषदेत अखेरच्या क्षणी सर्व म्हणजे आठ देशांनी प्रादेशिक विद्युत ग्रिड उभारण्याचे ठरविले असून मोदी आणि शरीफ यांच्या भेटीने सार्क परिषदेची इतिश्री झाली, असे ‘डॉन’ने म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करून एकमेकांकडे पाहत स्मितहास्य केल्याने खळबळ माजली, असेही वृत्तपत्राने म्हटले आहे.