लष्कराने केलेल्या कारवाईची माहिती सरकारने सर्वपक्षीय बैठकीत दिली. सर्वपक्षीयांनी लष्कराच्या कारवाईला पाठिंबा दिल्याचे माहिती व प्रसारणमंत्री वेंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले. ही बैठक तासभर चालली.

कारवाई कशा पद्धतीने करण्यात आली याबाबत गृहमंत्र्यांनी बैठकीत माहिती दिल्याचे नायडू यांनी सांगितले. जम्मू व काश्मीरमध्ये तसेच देशात इतरत्र घातपाती कृत्ये करण्याची दहशतवाद्यांची योजना होती, असे नायडू यांनी स्पष्ट केले. ते लष्कराने उधळून लावल्याचे नायडूंनी स्पष्ट केले. बैठकीला काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माकपचे सीताराम येचुरी, बसपचे सतीशचंद्र मिश्र, लोकजनशक्तीचे रामविलास पासवान उपस्थित होते. याखेरीज भाजप अध्यक्ष अमित शहा, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हजर होते.

बैठकीत महासंचालक (लष्करी कारवाई) लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी बैठकीत कारवाईबाबत माहिती दिली. याबाबत पाकिस्तानच्या महासंचालकांनाही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. गुप्तचरांच्या अहवालानंतर याबाबतच्या कारवाईबाबत निर्णय घेण्यात आला. नियंत्रण रेषेपासून कुपवाडाच्या विरुद्ध दिशेला केवळ तीन मीटरवर दहशतवाद्यांचे चार तळ गोळीबारात उद्ध्वस्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कारवाईवेळी पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक झाल्यानंतर लष्कराने याबाबतची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना या कारवाईची माहिती दिली.

पुराव्यांवरून पाकचा कांगावा

इस्लामाबाद : उरी येथील हल्ल्याबाबत भारताने कोणतेही पुरावे दिले नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने सुरूच ठेवला आहे. याबाबत आमच्याकडे केवळ एका पानाची माहिती देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकरीया यांनी केला. पुरावे आणि माहिती यात फरक आहे. यापूर्वीच्या घटनांमध्ये असेच करण्यात आल्याची भाषाही त्यांनी वापरली आहे. काश्मीरवरून लक्ष वळवण्यासाठी हा भारताचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.