उत्तराखंडात झालेल्या जलप्रकोपाचा फटका कैलाश मानसरोवर यात्रेला बसला आहे. उत्तराखंडात झालेल्या वाताहतीच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी ही यात्रा रद्द झाल्याचे जाहीर केले.
उत्तराखंडात रस्ते, नद्यांवरील पूल आणि विविध मार्ग पूर्णत उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी कैलाश मानसरोवर यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. यात्रेसाठी सज्ज असलेल्या १५ ते १८ या क्रमांकाच्या तुकडय़ांना आता मानसरोवराला जाता येणार नाही. यापूर्वी केंद्र सरकारने ८ जुलैला ११ ते १४ व त्यापूर्वी २ ते १० क्रमांकांच्या तुकडय़ांना यात्रेला अटकाव केला होता. मानसरोवर यात्रेला दरवर्षी १८ तुकडय़ांमध्ये यात्रेकरू जातात. यंदा उत्तराखंडात झालेला निसर्गाचा प्रकोप पाहूनच ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.