अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे विधान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे. अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिर बांधणे हे देशातील जनतेचे स्वप्न आहे. मात्र, आम्ही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहू अथवा परस्पर सहमतीने मार्ग काढण्याच प्रयत्न करू, असे शर्मा यांनी म्हटले आहे. आमच्या पक्षाने आणि सरकारने यापूर्वीच राम मंदिराच्या उभारणीचा निर्णय घेतला आहे. आम्हाला राम मंदिर बांधायचे आहे. परंतु, त्यासाठी आम्ही एकतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करू किंवा राम मंदिर बांधण्यासाठीचा सामाईक निष्कर्षापर्यंत पोहोचू. त्यामुळेच या सगळ्यासाठी इतका वेळ लागत असल्याचे शर्मा यांनी उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.
भाजप राम मंदिर बांधण्यासाठी कटिबद्द आहेच, याशिवाय देशातील जनतेलाही राम मंदिराची उभारणी व्हावी असे वाटते. मात्र, सध्या हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. हा निकाल येईपर्यंत अथवा परस्पर सहमतीने मार्ग निघेपर्यंत भाजपला प्राप्त परिस्थितीप्रमाणे चालणे भाग आहे. मला या मुद्द्यावर अधिकृतपणे बोलण्याचा अधिकार नाही. आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते किंवा सरकार यासंदर्भात निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी महेश शर्मा यांनी अयोध्येत भव्य संग्रहालय उभारण्याबद्दलही सुतोवाच केले. केंद्राने राम वन गमन पथ या प्रकल्पासाठी १७० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती शर्मा यांनी दिली