पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या आणि आयएसआयशी संपर्कात असलेल्या आणखी १८ फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून टाकली आहे. फुटीरतावादी नेत्यांसह १५५ राजकीय नेत्यांची सुरक्षा जम्मू-काश्मीर सरकारने बुधवारी रात्री काढण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी केंद्र सरकारने हुर्रियत परिषदेच्या सहा नेत्यांची सुरक्षा काढली होती. यात मीरवाईज फारूखचाही समावेश होता. या सर्वांसाठी सुमारे एक हजार पोलिस आणि १०० वाहने वापरली जात होती.

जम्मू-काश्मीर सरकारने फुटीरतावादी नेत्यांना दिलेला हा जोरदार दणका मानला जातोय. बुधवारी सायंकाळी जम्मू कश्मीर राज्याचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नेत्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्यात आला. फुटीरतावादी नेत्यांना सरकारी खर्चाने सुरक्षा देणे हा राज्याचा साधनसंपत्तीचा अपव्यय असल्याचे बैठकीत एकमत झाले. फुटीरतावदी नेत्यांच्या सुरक्षावर करण्यात येणारा खर्च अन्यत्र चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतो असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थाशी (आयएसआय) संपर्क ठेवणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेची समिक्षा केली जाईल असे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीर भेटीवर गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते. केंद्र सरकारच्या सल्ल्यानंतर आयएसआयशी संपर्क करत असलेल्याच्या ज्या फुटीरतावादी नेत्यावर संशय आहे अशा नेत्यांच्या सुरक्षाची समिक्षा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे एका आधिकाऱ्याने सांगितले.

या फुटीरतावादी नेत्यांची काढली सुरक्षा –
एसएसएस गिलानी, आगा सैद मोस्वी, मौलाना अब्बास अन्सारी, यासिन मलिक, सलीम गिलानी, शाहीद उल इस्लाम, झफर अकबर भट, नईम अहमद खान, मुख्तार अहमद वझा, फारूख अहमद किचलू, मसरूर अब्बास अन्सारी, आगा सैद अबुल हुसेन, अब्दुल गनी शाह आणि महंमद मुसादिक भट या फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली.