स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(एसबीआय) अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाल एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ‘एसबीआय’च्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर कार्यकाळ वाढविण्यात आलेल्या अरुंधती भट्टाचार्य या पहिल्या अध्यक्षा आहेत. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही अध्यक्षांना मुदतीनंतर कार्यकाळ वाढवून मिळालेला नाही. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र कार्यकाळ वाढविण्यात आल्यामुळे आता त्या ६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळतील.
जागतिक पातळीवरील धोरणानुसार स्टेट बँकेमध्ये सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या विलीनीकरणाची जबाबदारी सुरळीत पार पाडावी, म्हणून सरकारकडून अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाल वाढविण्यात आला असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. त्यामुळे सहयोगी बँकांचे विलीनीकरण त्यांच्या देखरेखीखाली होणार असल्याचे संकेत मिळतात.