अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत एक सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला असून, ‘यूपीए’ सरकारच्याच योजना नव्याने सादर केल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी दिली. अर्थमंत्री अरुण जेटलींनी सोमवारी लोकसभेत २०१६-१७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.  त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्यांनी जेटलींच्या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली. देशाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक तरतूदींचा अपेक्षा होती. मात्र, दुर्देवाने अर्थसंकल्पात अशा कोणत्याही तरतूदी करण्यात आलेल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी व्यक्त केली, तर कमनाथ यांचा दावा खोडून काढत  अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाचा कायापालट करण्याच्या दृष्टीने रचलेला पाया असल्याचे मत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले. याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अर्थसंकल्पाचे तोंड भरून कौतुक केले. इतिहासात पहिल्यांदाच रस्ते विकासासाठी १ लाख कोटी इतक्या भरघोस निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे गडकरी म्हणाले, तर यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकरी आणि गरिबांना समर्पित असलेला स्वातंत्र्योत्तर काळानंतरचा पहिला अर्थसंकल्प असल्याचे मत कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी व्यक्त केले.