दहाव्या सिलिंडरची किंमत २२० रुपयांनी वाढवण्याच्या निर्णयाविरोधात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी अनुदानित सिलिंडरची संख्या नऊवरून १२ करण्याचे संकेत दिले. यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार सध्या देशभरातील गॅस ग्राहकांना वर्षभरात नऊ अनुदानित सिलिंडर वापरण्याची मुभा आहे. त्यापुढील दहावा सिलिंडर ग्राहकांना बाजारभावानुसार विकत घ्यावा लागतो. तेल कंपन्यांनी नववर्ष दिनीच या सिलिंडरची किंमत तब्बल २२० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे हजार रुपयांत उपलब्ध असलेला हा सिलिंडर १२४१ रुपयांना मिळणार आहे. या निर्णयाविरोधात देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणीही अनेक स्तरांमधून केली गेली.
यूपीएतील घटक पक्षांनीही केंद्राच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या सर्व पाश्र्वभूमीवर दर कुटुंबाला मिळणाऱ्या अनुदानित सिलिंडरची संख्या १२ करण्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे पी. चिदम्बरम यांनी सांगितले.
‘पेट्रोलियम मंत्रालयाने नवी दरवाढ प्रत्यक्ष अमलात आणायची किंवा कसे, याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विनाअनुदानित दहाव्या सिलिंडरची किंमत कमी करण्याच्या तसेच वर्षांकाठी ९ ऐवजी १२ अनुदानित सिलिंडर देण्याच्या प्रस्तावांवर आम्ही विचार करीत आहोत.’
– पी. चिदम्बरम, केंद्रीय अर्थमंत्री