पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या रोज वाढणाऱ्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या मनात रोष वाढत चालला आहे. ग्राहकांवरील हा वाढता भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्क करात कपात केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी तसे संकेत दिले.

वाढत्या इंधन दरांबद्दल केंद्र सरकार अत्यंत गंभीर असून हे दर कमी करण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरु आहे. लवकरच यावर काहीतरी ठोस तोडगा निघेल असे प्रधान यांनी भुवनेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तेल उत्पादन करणाऱ्या देशांच्या ओपीईसी या संघटनेने उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच वेनेझुएलामध्ये राजकीय अस्थिरता आणि अमेरिकेचे इराणवरील अपेक्षित निर्बंध यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात इंधनाच्या किंमती वाढत आहेत असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यासानंतर १४ मे पासून रोजच्या रोज इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे.

गेल्या चार आठवडय़ांत आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांत झालेल्या वाढीचा भार देशातील इंधन कंपन्यांनी ग्राहकांवर टाकल्याने रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर आजवरच्या उच्चांकी पातळीवर गेले. रविवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३३ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर २६ पैशांनी वाढ करण्यात आली. मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८४ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर हे दर वाढविण्यात आले असून, आजवरचे हे उच्चांकी दर आहेत.

विविध राज्यांतील मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि स्थानिक करांनुसार दरांमध्यो थोडाफार फरक असेल. देशातील चार महानगरांमध्ये दिल्लीत इंधनाचे दर सर्वात कमी तर मुंबईत सर्वात जास्त असतील. इंधन कंपन्यांनी १४ मेपासून केलेली ही सलग सातवी भाववाढ आहे. गेल्या आठवडय़ात पेट्रोलच्या दरात एकूण १.६१ रुपये आणि डिझेलच्या दरात १.६४ रुपये वाढ झाली आहे.

डिझेलचा दर हैद्राबादमध्ये सर्वाधिक म्हणजे प्रति लिटर ७३.४५ रुपये आहे, तर मुंबईत ७१.९४, कोलकात्यात ७०.१२ आणि चेन्नईत ७१.३२ इतका आहे. अंदमान-निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथे डिझेल सर्वात स्वस्त म्हणजे ६३.३५ रुपये प्रति लिटर इतके आहे.