जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा न घेण्याचे राजस्थान सरकारने ठरवले आहे.

राज्यातील सर्व महाविद्यालयं, विद्यापीठ व तांत्रिक शिक्षण संस्थांधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा यंदा करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणार नसल्याचे राजस्थान सरकारने घोषित केले आहे. विद्यार्थांना परिक्षेविनाच पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. राजस्थान सरकारच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी याबाबत एका उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर घोषणा केली. करनो महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या व तांत्रिक शिक्षण संस्थांधील अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री गहलोत यांनी सांगितले.