टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना क्लिनचीट देणाऱया संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाचा कडाडून विरोध करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतलाय. या अहवालात तत्कालिन दूरसंचारमंत्री ए. राजा यांना घोटाळ्यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. राजा यांनीच पंतप्रधानांची दिशाभूल केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा बचाव करणाऱया समितीच्या ठरावाचा विरोध करण्याचा निर्णय भाजपने घेतला.
भाजपने स्पष्ट शब्दांत हा अहवाल फेटाळला असून, पंतप्रधानांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीये. कॉंग्रेसचे खासदार पी. सी. चाको हे टू जी घोटाळ्याप्रकऱणी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष होते. त्यांनीच दिलेल्या अहवालामध्ये केवळ राजा यांनाच घोटाळ्यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले असून, ड़ॉ. सिंग यांनी संयुक्त संसदीय समितीपुढे येऊन आपली बाजू मांडावी, असेही म्हटले आहे. जर या घोटाळ्यामध्ये राजा दोषी असतील, तर तुम्हीसुद्धा दोषी आहात, असाही आरोप सिन्हा यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.