अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहरीने गुरूवारी भारतीय उपखंडातील देशांमध्ये आपल्या संघटनेची शाखा स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर केंद्र सरकारकडून गंभीरपणे पावले उचलण्यात येत आहेत. अयमान अल जवाहरीने गुरूवारी प्रसारित केलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय उपखंडात इस्लामी राजवट आणि जिहादी चळवळीचा प्रसार करण्याचा इशारा दिला. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तातडीने बोलवण्यात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बैठकीत देशातील सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अल जवाहिरीने दिलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतात असणाऱ्या इस्लामी चळवळीतील कट्टरवाद्यांकडून आणि पाकिस्तानातील भारतविरोधी कारवाया करणाऱ्या गटांकडून धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय सुरक्षा दलांनाही अतिरेकी हल्ल्यांचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. अयमान अल जवाहरीने व्हिडिओतून भारतातील गुजरातमध्ये अल-कायदाचे जाळे विस्तारण्याचे म्हटले आहे. बांग्लादेशसह आसाम, गुजरात, अहमदाबाद आणि काश्मीरमध्ये इस्लामी जनतेवर होणाऱया अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी भारतीय उपखंडामध्ये अल-कायदाची शाखा स्थापन केल्याचे सांगितले.