प्रतिष्ठेचा आयफोन खिशात असावा असे तुम्हाला वाटते? महागडा आणि मोठा एलईडी टीव्ही खरेदी करण्याची तुमची मनिषा आहे? किंवा विदेशी बनावटीचे मायक्रोव्हेव अथवा सेट टॉप बॉक्स घरात आणण्याचा तुमचा विचार आहे? तर यासाठी आता अधिक पैसे मोजण्याची तयारी ठेवा! कारण अशा आयात उंची वस्तूंवरील शुल्क सरकारने दुपटीने वाढविले आहे.

नव्या अर्थसंकल्पाला महिन्याचा अवधी असला तरी स्मार्टफोन, टीव्ही, मायक्रोव्हेव, सेट टॉप बॉक्स एवढेच नव्हे तर एलईडी दिवे, टीव्ही कॅमेरा, इलेक्ट्रीक मीटर यावरील आयात तसेच सीमाशुल्क २० टक्क्यांपर्यंत नेण्यात आले आहे. अर्थखात्याने जारी केलेल्या परिपत्रकानुसार स्मार्टफोनवरील आयात शुल्क थेट १५ टक्क्यांवर नेण्यात आले आहे. सध्या त्यावर कोणतेही शुल्क लागू नाही. यामुळे आयफोनसारखे भारतात तयार न होणारे स्मार्टफोन अधिक महाग होणार आहेत. भारतात तयार न होणाऱ्या मात्र चिनी बनावटीच्या मोबाइलच्या किंमतीवरही याचा विपरित परिणाम होणार आहे. टीव्ही संच, एलईडी दिव्यांवरील सीमाशुल्क दुप्पट करताना ते २० टक्के ठेवण्यात आले आहे. निवडक उपकरणांवरील आयात शुल्क वाढल्याने सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेलाही यामुळे अधिक चालना मिळेल, असा विश्वास गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख कमल नंदी यांनी व्यक्त केला आहे. तर स्थानिक उत्पादक, उद्योगांना यामुळे निर्मितीकरिता प्रोत्साहन मिळेल, असा आशावाद व्हिडिओकॉनचे मुख्य निर्मिती अधिकारी अभिजीत कोटणीस यांनी व्यक्त केला.