संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून
संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून ते वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्ष असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर सरकारला धारेवर धरण्याची शक्यता असून असहिष्णुतेचा निषेध करणारा ठराव करण्याचा आग्रह केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र संसदेचे कामकाज सुरळीतपणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयक या अधिवेशनात संमत झाले तर सरकारसाठी ती मोठी कामगिरी ठरणार आहे. दरम्यान दादरी आणि एम. एम कलबुर्गी हत्या यांसारख्या घटनांना सरकारचा पाठिंबा नाही, अशी भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे.

आमीर खानने असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यावर सर्व पक्षीय बैठकीत चर्चा झाली. असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर तातडीने चर्चा झाली पाहिजे. चित्रपट कलाकार, लेखक आणि चित्रपट निर्माते यांनी पुरस्कार परत केले ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे, असे विरोधकांचे मत आहे. संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले, की सरकार असहिष्णुतेसह सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे; पण खरेतर हे प्रश्न राज्यांच्य अखत्यारीतील आहेत. आम्ही अशा घटनांना पाठिंबा दिलेला नाही. दादरीतील घटना आणि एम. एम. कलबुर्गी यांची हत्या या घटना दुर्दैवी होत्या आणि सरकार अशा घटनांचा निषेध करते. पंतप्रधान मोदी यांनीही या घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. शांतता आणि सुसंवादाच्या वातावरणातच देशाचा विकास होऊ शकतो त्यामुळे जात, वंश, धर्म या पलीकडे जाऊन विरोधकांनी विचार करावा.

अधिवेशन सुरळीत – मोदी

पंतप्रधान मोदी या बैठकीस काही काळ उपस्थित होते त्यांनी सांगितले, की लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालणे आवश्यक आहे. मोदी यांनी विरोधकांना आश्वासन दिले, की अर्थमंत्री अरुण जेटली त्यांच्या काही शंका असतील व त्यांना काही सुधारणा हव्या असतील तर त्यावर संवाद साधतील. वस्तू व सेवा कर विधेयक देशाच्या फायद्याचे आहे त्यावर काही शंका असतील, तर जेटली त्यावर उत्तरे देतील.

माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सांगितले, की असहिष्णुतेशी संबंधित घटनांचा निषेध करणारा एक ओळीचा ठराव आपण राज्यसभेला दिला आहे. अशा घटना परत घडणार नाहीत याची सरकारने हमी द्यावी. राज्यसभा अध्यक्षांनी ठरावाची नोटीस स्वीकारली आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयकाला विरोधकांचा पाठिंबा आहे, काँग्रेसचा विरोध नाही असा दावा व्यंकय्या नायडू यांनी केला.

असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करणार – राहुल
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बंगळुरू येथे सांगितले, की आम्ही संसदेत असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करणार आहोत. देशात जे चालले आहे ते अस्वस्थ करणारे आहे व पंतप्रधान मात्र त्यावर शांत आहेत. वस्तू व सेवा कर विधेयकाला आमचा विरोध नाही पण सरकारने त्यावर आमच्याशी संपर्क साधून शंका दूर केल्या पाहिजेत.