रामविलास पासवान यांची माहिती
बडे व्यापारी आणि आयातदारांनी परदेशात डाळींची मोठय़ा प्रमाणावर साठेबाजी केली असल्याची तक्रार सरकारकडे प्राप्त झाली असल्याची माहिती केंद्रीय अन्नपुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली.
तथापि, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि ब्लॅक मार्केटिंग आणि जीवनावश्यक वस्तू पुरवठा परिरक्षण कायदा १९८० अन्वये केवळ देशातील साठेबाजीविरुद्धच कारवाई करता येते, असेही पासवान यांनी सभागृहात सांगितले. देशात सध्या निर्माण झालेल्या डाळींच्या तुटवडय़ाला बडय़ा घाऊक कंपन्या जबाबदार असल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाने स्पष्ट केले आहे त्याची सरकारने नोंद घेतली आहे का, असा सवाल विचारण्यात आला होता. देशातील १४ राज्यांमध्ये टाकण्यात आलेल्या १४ हजार १३४ छाप्यांत १.३० लाख टन डाळ जप्त करण्यात आल्याची माहिती पासवान यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. त्यापैकी ५१ हजार ७३२.२७ टन डाळ बाजारपेठेत वितरित करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.