मुंबईवर झालेल्या (२६/११) हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यासाठी भारतीय हवाई दल तयार होते. मात्र, पाकिस्तानवर हल्ला करण्याचा हवाई दलाचा प्रस्ताव तत्कालिन सरकारने नाकारला, असा खुलासा माजी हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी केला आहे.

मुंबईत एका महाविद्यालयाच्या वार्षिक समारंभात ते बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. धनोआ म्हणाले, पाकिस्तानात कुठल्या ठिकाणी दहशतवादी कँप आहेत, हे आम्हाला माहिती होतं आणि आम्ही कारवाईसाठी तयार होतो. मात्र, या दहशतवादी कँपवर हल्ला करायचा की नाही हा राजकीय निर्णय होता. त्यानुसार सरकारने हल्ल्याचा आमचा प्रस्ताव नाकारला. धनोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात हवाई दलाचे प्रमुख होते.

संसदेवरील हल्ल्यानंतरही दिला होता कारवाईचा प्रस्ताव

डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतरही हवाई दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ल्यांद्वारे प्रतिकारवाई करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, हा प्रस्ताव स्विकारण्यात आला नाही. भारतात अशांतता आणि दहशतवाद पसरवणे ही पाकिस्तानची दोन हत्यारं आहेत. त्यामुळे जर भारतात शांतता प्रस्थापित झाली तर पाकिस्तान आपले अनेक विशेषाधिकार गमावून बसेल. त्यामुळेच पाकिस्तान काश्मीरमध्ये अशांतता कायम ठेऊ इच्छितो.

शेजारील राष्ट्रे अण्वस्र सज्ज असल्याने भारतासमोर मोठं आव्हान

पाकिस्तान भारताविरोधात आपला हेतू साध्य करण्याच्या कामात गुंतला आहे. त्यामुळे यापुढेही हा देश भारतावर असेच हल्ले करत राहणार आहे. मात्र, एखाद्या छोट्या किंवा मोठ्या कोणत्याही हल्ल्यासाठी हवाई दल सज्ज असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. भारताची शेजारील दोन राष्ट्रे अण्वस्र संपन्न असल्याने भारतासमोर सर्वात मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.