माहितीचे साठे रिते करणारे ‘सायबर हल्ले’ रोखण्यासाठी आणि इंटरनेटद्वारे होणारे व्यवहार अबाधित राखण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी सायबर सुरक्षा धोरण जारी केले आहे. ऊर्जा, अणुप्रकल्प, संरक्षण दले तसेच दळणवळण विभाग अशा अत्यंत संवेदनक्षम व महत्त्वाच्या यंत्रणांसमोर ‘सायबर हल्ल्यां’मुळे उद्भवणाऱ्या धोक्यांना या धोरणामुळे पायबंद बसेल, असा विश्वास केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी व्यक्त केला.
सिब्बल म्हणाले की, कागदावरील धोरण हे आमच्या दृष्टिकोनाची एक रूपरेखाच असते. हे धोरण प्रत्यक्षात आणण्याचे काम हे अधिक आव्हानात्मक पण तितकेच अनिवार्य असते. देशाच्या आर्थिक प्रगतीला हे हल्ले मारक ठरू शकतात. त्यामुळेच ते सर्व उपायांनिशी रोखले जातील.
जगभरातील अज्ञात अशा कोपऱ्यांतूनही इंटरनेटद्वारे आपल्या देशात घुसखोरी होऊ शकते. बलाढय़ औद्योगिक साम्राज्यही जसे काही गैरहेतूने ही घुसखोरी करते त्याचप्रमाणे दहशतवादीही देशाला अस्थिर करण्यासाठी या मार्गाचाही वापर करीत आहेत. दहशतवाद्यांना छुपा वा उघड पाठिंबा असलेले देश तसेच अविचारी गटही हा मार्ग अवलंबित आहेत. त्यामुळे सायबर धोरणाची अत्यंत गरज होती, असेही सिब्बल म्हणाले.

सायबर सुरक्षा धोरणात नमूद उद्दिष्टे
देशात पारदर्शक सायबर यंत्रणेला प्रोत्साहन देणे, सायबर संरक्षक उपाय योजणाऱ्या उद्योगांना वित्तीय लाभ देणे, पुढील पाच वर्षांत देशाला सायबर सुरक्षेसंबंधात स्वयंसिद्ध करण्यासाठी सायबर सुरक्षा क्षेत्रात पाच लाख कुशल तंत्रज्ञ घडविणे, सायबर सुरक्षेसंबधात कौशल्य विकास व मुलभूत प्रशिक्षणाची सोय करणे, देशहिताला धोका पोहोचवू शकणाऱ्या सायबर व्यवहारांवर दिवसरात्र लक्ष ठेवणारी राष्ट्रीय व प्रांतिक यंत्रणा तयार करणे, सायबर सुरक्षाविषयक देशी यंत्रणेसाठी संशोधनाला वाव देणे, सायबर सुरक्षेसंबंधातील सर्व प्रकरणे हाताळण्यासाठी देश पातळीवर संस्था स्थापणे, सर्व संस्था व आस्थापनांना सायबर सुरक्षेसाठीच्या खर्चाची तरतूद वार्षिक अंदाजपत्रकात करायला लावणे, नवनव्या तंत्रज्ञानाच्या आधारे सायबर क्षेत्रात उद्भवू शकणाऱ्या आव्हानांचा कायदेशीर सामना करण्यासाठीची यंत्रणा तयार करणे व तिचा ठरावीक मुदतीत वारंवार आढावा घेणे, संगणकीय पातळीवर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपाय योजण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कॉम्प्युटर इमर्जन्सी रीस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) ही मध्यस्थ संस्था स्थापून आपत्ती व्यवस्थापनाला वाव देणे.

Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान
byju s shuts 30 out of 292 tuition centres for cost cutting
बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल