फेसबुक युजर्सच्या डाटा लीक प्रकरणात केंद्र सरकारने फेसबुकला नोटीस पाठवली आहे. भारतीय मतदार आणि युजर्सच्या डाटाचा केंब्रिज अॅनालिटिका आणि अन्य कंपन्यांनी वापर केला आहे का ? असा प्रश्न सरकारने फेसबुकला विचारला आहे. भारतातील निवडणूक प्रक्रिया प्रभावित करण्यासाठी फेसबुक डाटाचा वापर झाला आहे का ? असा सवाल सरकारने विचारला आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने या प्रश्नांची सविस्तर उत्तरे मागितली असून त्यासाठी फेसबुकला ७ एप्रिल २०१८ पर्यंतची मुदत दिली आहे. याआधी सरकारने शुक्रवारी फेसबुकला नोटीस पाठवून केंब्रिज अॅनालिटिकाने फेसबुकचा जो डाटा मिळवलाय त्याची माहिती मागितली होती. कुठल्या कंपनीने फेसबुक डाटाचा दुरुपयोग केला असेल तर त्याच्या सुरक्षेसाठी फेसबुकने काय पावले उचलली ? त्याची माहिती सुद्धा मागितली आहे.

युजर्सचा डाटा वापरुन भारतीय निवडणूक प्रकिया प्रभावित होऊ नये यासाठी फेसबुकने कोणती पावले उचलली आहेत त्याची माहिती सुद्धा मागितली आहे. फेसबुकचे सर्वाधिक युजर्स भारतात आहेत. इतक्या मोठया संख्येने युजर्स असताना कुठल्या तिसऱ्या पक्षाने दुरुपयोग करु नये यासाठी फेसबुकने सुरक्षेच्या दृष्टीने काय पावले उचलली आहेत ? असे मंत्रालयाने पावलेल्या पत्रात म्हटले आहे. भारतीय युजर्सच्या डेटाचा केंब्रिज अॅनालिटिका किंवा अन्य कुठल्या कंपनीने दुरुपयोग केला असेल तर तो कसा केलाय ? फेसबुक त्यांच्या संबंधित कंपन्या किंवा अन्य कंपन्या भारताची निवडणूक प्रक्रिया प्रभावित करण्यामध्ये सहभागी आहेत का ? असे प्रश्न मंत्रालयाच्यावतीने पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये विचारण्यात आले आहेत.

काय आहे ‘केंब्रिज अॅनालिटिका’ प्रकरण?
संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीशी निगडीत आहे. २०१६ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आदी माहितीचा वापर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आल्याचं समोर आलं. केंब्रिज अॅनालिटिकाने ‘फेसबुक’वरील लक्षावधी नागरिकांचा तपशील त्यांच्या परवानगीशिवाय वापरला असा आरोप आहे. जवळपास पाच कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचं उघड झालं आहे.