फेसबुकच्या माध्यमातून ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती अनधिकृतरित्या मिळवल्याप्रकरणी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ब्रिटिश राजयकीय डेटा विश्लेषक कंपनी ‘केंब्रिज अॅनालिटिका’ कंपनीने भारतीयांचीही वैयक्तिक माहिती मिळवल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘केंब्रिज अॅनालिटिका’ला नोटीस पाठवली असून कंपनीच्या माध्यमांतून सोशल मीडियाद्वारे भारतीयांची माहिती मिळवणारा क्लायंट कोण आहे तसेच भारतीयांची माहिती मिळवण्यापूर्वी त्यांची संमती घेतली होती का? या प्रश्नासह इतर ४ महत्वाचे प्रश्न विचारले आहेत.

केंद्र सरकारने २३ मार्च २०१८ रोजी केंब्रिज अनॅलिटिकाला ही नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत सरकारने या कंपनीला भारतीयांसंदर्भात महत्वाचे सहा प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची माहिती कंपनीने ३१ मार्चपर्यंत द्वावी असेही सरकारने म्हटले आहे. अन्यथा कंपनीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल अशा इशाराच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केंब्रिज अॅनालिटिकाला दिला आहे.

सरकारने पाठवलेल्या नोटिशीत विचारलेले प्रश्न :

१) भारतीयांच्या माहितीचा वापर करण्यामध्ये कंपनीचा स्वतःचा सहभाग आहे का?
२) कंपनीच्या माध्यमातून भारतीयांची माहिती मिळवणाऱ्या दुसऱ्या कंपन्या कोणत्या आहेत?
३) भारतीयांची माहिती त्यांनी कशा प्रकारे मिळवली?
४) माहिती मिळवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेतली होती का?
५) या माहितीपर्यंत कंपनी कशी पोहोचली?
६) या मिळवलेल्या माहितीच्या आधारे काही नवी प्रोफाईल्स तयार करण्यात आली आहेत का?

दरम्यान, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून कॉम्प्युटर इमर्जन्सी रिसर्च टीम (सीईआरटी)कडून फेसबुक वापरणाऱ्या युजर्ससाठी निर्देश दिले आहेत की, युजर्सने स्वतःची माहिती शेअर करु नये, या माहितीमध्ये ठिकाण, राजकीय दृष्टीकोन त्याचबरोबर इतर ओळख पटवणारी माहिती सोशल मीडियावर उघड करु नये.