सरकारने आदर्श मालकासारखे वागावे आणि आपल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना तसेच त्यांना बढत्या देताना त्यांना मानाने वागवावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. खंडपीठाचे न्या. के.एस.राधाकृष्णन् आणि न्या. दीपक मिश्रा यांनी हे मत नोंदविले आहे. आपल्याशी योग्य वर्तन होईल आणि आपला विश्वासघात होणार नाही, अशी सरकारी कर्मचाऱ्यांची खात्री पटल्यानंतरच योग्य कारभाराची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल, याकडे न्यायाधीशांनी लक्ष वेधले. सरकार हे एखाद्या आदर्श मालकासारखेच असावे आणि सरकारनेच तयार केलेल्या नियमांचा त्याने आदर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. आसाममधील पोलीस अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने हे मत मांडले आहे.