यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्र सरकारच्या तिजोरीतून तब्बल ३४२६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या खर्चात १३१ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहितीही पुढे आली आहे. एकूण यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वाधिक खर्चिक निवडणूक असल्याची चर्चा होत असताना आता निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या खर्चाचाही नवा उच्चांक नोंदविला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सरकारच्या तिजोरीतून १४८३ कोटी रुपये खर्च झाले होते. पाच वर्षांमध्ये या खर्चात १३१ टक्क्यांची वाढ झाली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घ्यावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपाय योजण्यात आले होते. त्यामुळेही यंदाच्या निवडणूक खर्चात वाढ झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.
यंदा असंख्य राजकीय पक्षांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर निवडणुकीसाठी उभे असलेल्या अपक्षांची संख्याही गतवेळेसपेक्षा वाढलेली होती. उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे निवडणुकीचा खर्चही वाढला. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाने असंख्य कार्यक्रम घेतले. मतदानापूर्वी प्रत्येक मतदारापर्यंत त्याचे छायाचित्र असलेली मतदार पावती पोहोचविण्यात आली. या सगळ्या उपायांमुळेही निवडणुकीच्या खर्चात वाढ झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.
देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीतील खर्चाच्या तुलनेत गतवेळच्या निवडणुकीच्या खर्चात २० पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीत १९५२ साली प्रत्येक मतदारावर निवडणुकीसाठी केवळ ६० पैसे खर्च झाले होते. मात्र, २००९ मध्ये हाच खर्च प्रतिमतदार १२ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता.