खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱया महिलांना मिळणाऱया प्रसुती रजेत वाढ करण्याचा निर्णय आता अंतिम टप्प्यात आहे. नोकरी करणाऱया महिलांना प्रसुती काळात मिळणारी १२ आठवड्यांची प्रसुती रजा आता २६ आठवड्यांची करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनीही यास दुजोरा दिला आहे. प्रसुती आणि त्यानंतरच्या काळात अपत्याच्या दैनंदिन पालनपोषणासाठी मातेला दिल्या जाणाऱया रजेत वाढ करून ती साडेसहा महिन्यांची करण्याबाबतचे लेखी पत्र कामगार मंत्रालयाला पाठविण्यात आले होते. त्यास कामगार मंत्रालयानेही सहमती दर्शविली असल्याचे मेनका गांधी यांनी सांगितले.
कामगार कायद्यानुसार प्रसुती काळात महिला नोकरदारांना सध्या १२ आठवड्यांची भरपगारी रजा मिळते. तीत वाढ करून साडेसहा महिन्यांची करण्यास कामगार मंत्रालयाने तयारी दर्शविली आहे. पण ही रजा आठ महिन्यांची असावी, अशी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची अपेक्षा होती. अखेर कामगार मंत्रालयाने प्रसुती रजा साडेसहा महिने देण्यास सहमती दिली.