25 November 2017

News Flash

अफझलच्या कुटुंबीयांना मृतदेह मिळणे अवघडच

संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरू याच्या मृतदेहाचा ताबा देण्याची त्याच्या कुटुंबीयांची विनंती सरकारकडून

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: February 19, 2013 1:07 AM

संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरू याच्या मृतदेहाचा ताबा देण्याची त्याच्या कुटुंबीयांची विनंती सरकारकडून फेटाळली जाण्याची शक्यता आहे. अफझलला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली आणि तिथेच त्याच्यावर दफनविधी करण्यात आला.
यासंदर्भात अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल आणि तो जम्मू व काश्मीर सरकारला कळविण्यात येईल, असे गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अफझलच्या मृतदेहाचा ताबा देण्यात यावा, अशी विनंती करणारे पत्र त्याची पत्नी तबस्सूम हिने राज्य सरकारला पाठविले आहे. हे पत्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविले आहे.
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, तुरुंगाच्या नियमावलीनुसार अफझल गुरूचा मृतदेह तिहार तुरुंगाच्या आवारात दफन करण्यात आला आहे. जम्मू व काश्मीरमधील कायदा व सुव्यवस्था स्थिती तसेच इतर घटक लक्षात घेता हा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचा विचार सरकार करू शकत नाही. काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी या प्रमुख पक्षासह विविध संघटनांनी अफझलचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. त्याचा मृतदेह काश्मीर खोऱ्यात आणण्यात येऊन रात्रीच दफनविधी करण्यात आल्याची अफवा रविवारी राज्यात पसरली होती. या विषयावर उलटसुलट चर्चा अद्यापही चालू आहे.
अफझलच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात झालेल्या दिरंगाईबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गेल्या आठवडय़ात त्यांची नाराजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे व्यक्त केली होती. काश्मीरमधील दहशतवादी मकबूल बट याचाही दफनविधी त्याच्या फाशीच्या शिक्षेनंतर तिहार तुरुंगातच करण्यात आला आहे. बट याचा दफनविधी जिथे करण्यात आला त्यापासून काही अंतरावर अफझलचा दफनविधी करण्यात आला. बट याच्या अस्थी त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्या नव्हत्या. दफनविधीच्या ठिकाणी अफझलच्या कुटुंबीयांना जाण्याची परवानगी देण्यात येईल, असे सरकारने याआधीच स्पष्ट केले आहे. हा प्रस्ताव अफझलच्या कुटुंबीयांनी फेटाळला आहे.

First Published on February 19, 2013 1:07 am

Web Title: govt unlikely to give afzals body to family
टॅग Afzal Guru