करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यांपासून रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं १७ मे पर्यंत रेल्वे सेवा सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. पंरंतु आता १२ मे पासून मर्यादित रेल्वे मार्गांवर रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच उद्या संध्याकाळपासून या रेल्वे सेवांचं तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

१२ मे पासून काही ठराविक मार्गांवर रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली. यामध्ये दिल्ली ते मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू तावी, तिरुअनंतरपुरम, मडगाव, दिब्रुगढ, अगरताला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई या स्थानकांना जोडणारी रेल्वेसेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरूवातीला रेल्वेच्या १५ जोड्या म्हणजेच एकूण ३० फेऱ्या होणार आहेत. तसंच या सोबत राज्य सरकारांच्या विनंतीप्रमाणे श्रमिक ट्रेनही सुरूच ठेवण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क वापरणं बंधकारक असणार आहे. तसंच सर्व प्रवाशांचं प्रवासापूर्वी थर्म स्क्रिनिंगही करण्यात येणार आहे. करोनाचं कोणतंही लक्षण नसलेल्या प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करता येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाद्वारे सांगण्यात आलं आहे.

उद्यापासून तिकीट आरक्षण

१२ मे पासून रेल्वे मर्यादित स्थानकांवर रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार असून त्याची तिकीट विक्री उद्यापासून (सोमवार) करण्यात येणार आहे. प्रवशांना संध्याकाळी ४ वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन तिकिटांचं आरक्षण करता येणार आहे.


एसी कोचसोबतच ट्रेन चालणार

सर्व प्रवासी रेल्वे या एसी कोचसोबतच धावणार आहेत. तसंच या ट्रेन ठराविक मार्गांवरच थांबतील. या ट्रेनच्या तिकिटांचे दर राजधानीसाठी घेतल्या जाणाऱ्या दरांप्रमाणेच असतील अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.