ग्राफिनवर लेसर प्रक्रिया करून त्याचा वापर कमी किमतीच्या कागदावर आधारित असलेल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये करता येणार आहे. याबाबतच्या संशोधनात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे. नवीन लेसर तंत्रज्ञानामुळे ग्राफिन सर्किट्सची निर्मिती शक्य आहे. ग्राफिन हा बहुगुणी रासायनिक पदार्थ असून तो विद्युत व उष्णता यांचा वाहक आहे. तो मजबूत व स्थिर असून त्याचे पदार्थविज्ञानातील गुणधर्म प्रत्यक्ष वापरात आणले जाणार आहेत. इंकजेट प्रिंटरच्या मदतीने बहुस्तरीय ग्राफिनवर सर्किट तयार करता येते, त्यात इलेक्ट्रोड्सचाही वापर असतो. त्यामुळे लवचीक व परिधेय इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करता येतात. आताच्या तंत्रज्ञानात यामध्ये काही अडचणी आहेत. त्यात विद्युत वहनशीलता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतात. त्यासाठी जास्त तापमान व वेगळी रसायने लागतात. त्यात प्लास्टिक फिल्म्स व कागदाचा वापर केला जातो. आयोवा स्टेट विद्यापीठातील सहायक प्राध्यापक जोनाथन क्लॉसेन व संशोधक विद्यार्थी सुप्रेम दास यांनी लेसरच्या मदतीने ग्राफिनवर सर्किट्स काढण्याचे तंत्र विकसित केले आहे. इंकजेट प्रिंटिंगने सर्ट काढता येतात व त्यात पल्सड लेसर पद्धतीने कागद, बहुवारिक किंवा इतर पदाथार्ंची हानी न करता विद्युतवहनशीलता वाढवता येते. इंकजेट प्रिंटेड ग्राफिनचा वापर संवहनशील पदार्थ म्हणून करता येतो हे यात दाखवून दिले आहे, असे क्लॉसेन यांनी सांगितले. यात जैविक संवेदक, ऊर्जा साठवण प्रणाली, विद्युत वाहक घटक तसेच कागदावर आधारित इलेक्ट्रॉनिक सर्किट्सची निर्मिती शक्य होणार आहे. यात ग्राफिन ऑक्साईडचे रूपांतर ग्राफिनमध्ये केले जाते. ग्राफिनचे पापुद्रे एकत्र चिकटवून विद्युत वहनशीलता हजारो पटींनी वाढवली जाते. दास यांच्या मते उच्च ऊर्जा फोटॉन ग्राफिनची हानी करीत नाहीत. लेसरने त्याचे त्रिमिती व सपाट पृष्ठभाग तयार करता येतात. त्रिमिती भाग हे पाकळ्यांसारखे असतात. रासायनिक व जैविक संवेदकांसाठी हे तंत्रज्ञान उपयोगी आहे. ‘नॅनोस्केल’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.