दिल्लीजवळ ग्रेटर नोएडात यमुना एक्स्प्रेस वेवर चार महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे खळबळ निर्माण झाला आहे.

ग्रेटर नोएडातील एका कुटुंबातील सात जण बुधवारी रात्री एकच्या सुमारास एका कारमधून जेवर येथून बुलंदशहर येथे जाण्यासाठी निघाले होते. बुलंदशहरमध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाची भेट घेण्यासाठी  हे सर्व जण निघाले होते. साबौता गावाजवळ येताच कारखाली काही तरी अडकल्याचे जाणवल्याने त्यांनी कार थांबवली. खाली उतरुन कारची तपासणी केली असता कारचे पुढचे दोन्ही टायर पंक्चर झाल्याचे निदर्शनास आले. शेवटी गाडीतील एका व्यक्तीने घरी भावाला फोन करुन मदतीसाठी येण्यास सांगितले. भाऊ येईपर्यंत सर्वांना गाडीतच बसणे भाग होते. मात्र यादरम्यान, सहा ते सात जणांनी कारला चारही बाजूंनी घेरले. हातात शस्त्र असलेल्या चोरट्यांनी कारमधील मंडळींकडे असलेले मोबाईल, दागिने आणि रोखरक्कम हिसकावून घेतली. पण चोरटे फक्त चोरी करुन परतले नाही. त्यांनी कारमधील सर्व महिलांना गाडीतून उतरवून रस्त्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न केला. याला कुटुंबातील एका व्यक्तीने विरोध केला असता चोरट्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात त्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चारही महिलांना रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी नेऊन चोरट्यांनी त्यांच्यावर  सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले. मात्र तोपर्यंत चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. कारमधील पुरुषांना चोरट्यांनी बांंधून ठेवल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

गौतम बुद्धनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लवकुमार यांनी गुरुवारी घटनास्थळाची पाहणी केली. गुन्हे शाखा, विशेष कृती दल आणि स्थानिक पोलिसांचे पथक या घटनेचा तपास करत आहे. चोरट्यांना अटक करण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पीडित महिलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वैद्यकीय तपासणीचा अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही असे त्यांनी सांगितले. या घटनेने दिल्ली आणि सभोवतालच्या भागातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.