संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ग्रीसने युरोझोनमध्ये राहण्याच्या विरोधात मतदान केले आहे. युरोपियन देशांचे बेलआऊट पॅकेज ग्रीसमधील जनतेने बहुमताने नाकारले आहे. या संदर्भात घेण्यात आलेल्या मतदानात ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी विरोधात मतदान केले.
लोकांच्या जगण्याच्या, निश्चयाने जगण्याच्या इच्छेकडे आणि आपले भवितव्य स्वत:च्या हाती घेण्याकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही, असे मतदान केल्यानंतर निश्चिंत दिसणारे ग्रीसचे पंतप्रधान अ‍ॅलेक्सिस त्सिप्रास म्हणाले. ११ लाख लोकसंख्येच्या ग्रीसमध्ये या सार्वमतासाठी ११ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. कर्जातून सुटका होण्याकरता आंतरराष्ट्रीय कर्जदारांकडून आणखी निधी (बेलआउट फंड्स) मिळण्याच्या मोबदल्यात तुम्ही कठोर आर्थिक शिस्त स्वीकारण्यास तयार आहात काय, असा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला होता. मतदारांनी या विरोधात मतदान केले.
कर्जाचा बोजा प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे सरकारने बँका बंद करणे आणि एटीममधून दररोज फक्त ६० युरो काढण्याचे निर्बंध लागू करणे यासारखे कठोर उपाय योजल्यानंतर हे सार्वमत घेण्यात आले.