ग्रीसला कर्जाच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठीच्या संपुट योजनेतील सुधारणा कार्यक्रमास संसदेने मंजुरी दिली आहे. या सुधारित प्रस्तावात काटकसरीच्या अनेक उपायांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय कर्जदारांशी वाटाघाटी करण्यासाठी एक प्रस्ताव संसदेत मांडला होता त्याच्या बाजूने २५१ तर विरोधात ३२ मते पडली, ८ जण तटस्थ राहिले. आता या प्रस्तावाच्या आधारे ग्रीस युरोपीय कर्जदारांशी वाटाघाटी करू शकेल. जे तटस्थ राहिले व जे अनुपस्थित राहिले ते सर्व जण पंतप्रधान अ‍ॅलेक्सिस सिप्रास यांच्या डाव्या सीरिझिया पंक्षाचे सदस्य असल्याने सरकारच्या स्थिरतेबाबत शंका निर्माण झाली आहे. बंडखोरांमध्ये दोन मंत्र्यांचा समावेश असून त्यात ऊर्जा मंत्री पॅनॅगियोटिस लाफाझानी व सामाजिक सुरक्षा मंत्री दिमित्री स्ट्रॅटोलिस यांचा समावेश आहे. संसदेतील सभापती झो कॉन्टँटोपोलू यांचाही बंडखोरात समावेश आहे.
लाफाझानिस यांनी सांगितले की, आपला सरकारला पाठिंबा आहे पण काटकसरीच्या योजनांना नाही. नवउदारमतवादी नियंत्रणमुक्ती व खासगीकरण आपल्याला मान्य नाही कारण त्यामुळे मंदी, दारिद्रय़ हे चक्र सुरूच राहील. माजी अर्थमंत्री यानिस वारोफॉकनिस हे उपस्थित नव्हते. आपली मुलगी ऑस्ट्रेलियाहून आली असल्याने आपण तिच्याबरोबर आहोत. आपण सभागृहात उपस्थित असतो तर बाजूने मतदान केले असते असे त्यांनी म्हटले आहे. नाझी प्रेरित गोल्डन डॉन पक्ष व कम्युनिस्ट पक्ष वगळता सर्व विरोधी पक्षांनी बाजूने मतदान केले.
नव्या प्रस्तावानुसार कर वाढवणे, पेन्शन खर्चात कपात करणे या बाबींना मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे ग्रीसच्या जनतेला फटका बसला आहे. याच योजनेच्या विरोधात जनतेने काही दिवसांपूर्वी मतदान केले होते पण नवीन प्रस्तावात ग्रीसने आंतरराष्ट्रीय कर्जदार दीर्घकालीन कर्जे देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कर्ज आणि परतफेडीस सवलतही
ग्रीसमध्ये गेली सहा वर्षे मंदीच आहे. कर्जदारांच्या अटी मान्य केल्या नाही तर ग्रीसला युरोपीय समुदायातून बाहेर पडावे लागणार असून युरो हे चलनही सोडून द्यावे लागेल. आता कर्जदारांनी ग्रीसचा प्रस्ताव मान्य केला तर तीन वर्षांचे ६० अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळेल व कर्जाच्या परतफेडीतही सवलत मिळेल. ग्रीसच्या ७.२ अब्ज युरोच्या आधीच्या कर्जापेक्षा ही रक्कम जास्त असेल.