भारतामधील शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या टूल किट प्रकरणावरुन चर्चेत आलेली स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासावर निशाणा साधला आहे. नासाच्या मंगळ मोहिमेसंदर्भात ग्रेटाने संताप व्यक्त केला आहे. ग्रेटाने मंगळ ग्रहावरील पर्यटनासंदर्भातील एक जाहिरात शेअर करत उपहासात्मक टोला लगावला आहे. एकीकडे पृथ्वी क्लायमेट चेंज म्हणजेच वातावरण बदलासंदर्भातील अनेक प्रश्नांना तोंड देत असतानाच वेगवेगळ्या देशांमधील सरकारने तसेच अंतराळ संस्था अब्जावधी रुपये दुसऱ्या ग्रहांवर जाण्यासाठी खर्च करत आहेत, असा टोला ग्रेटाने लगावला आहे.

ग्रेटाने नासाच्या मंगळ मोहिमेसंदर्भात टोला लगावताना व्हिडीओ शेअर केला असून या मोहिमेचा फायदा केवळ एक टक्के जणांना होणार असल्याचं तिने म्हटलं आहे. या एक टक्के लोकांनी पृथ्वी सोडून द्यावी आणि ९९ टक्के लोकांना त्यांनी पृथ्वीवरच राहू द्यावे. त्यामुळे पृथ्वीवर राहिलेले लोकं येथील पर्यावरणासंदर्भातील समस्यांवर काम करु शकतील असं ग्रेटाने या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये मंगळावर अद्याप कोणीही पोहचलेलं नाही त्यामुळे या जमिनीला कोणीही स्पर्ष केलेला नसून येथे गुन्हेगारी, काही बंधने, साथीचे रोग, पर्यावरणासंदर्भातील समस्या नसून येथे मानवाला नवीन सुरुवात करता येईल अशी जाहिरात करण्यात आली आहे.

नासाचे पर्सिव्हिअरन्स हे यान मंगळावर उतरलं आहे. १८ फेब्रवारी रोजी पहाटे २.३० वाजता नासाच्या पर्सिव्हियरन्स रोव्हरचं मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आलं. जीझीरो क्रेटर (Jezero Crater) या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे. या मोहिमेसाठी नासाने ७० कोटी डॉलर्स खर्च केले आहेत. नासाने मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरने जमिनीवर उतरताच पहिलं छायाचित्र पाठवलं असून, नासाने ट्विटरवर पोस्ट केलं आहे. मंगळवार जीवसृष्टी अस्तित्वात होती का? याचा शोध घेण्यासाठी नासानं पर्सिव्हियरन्स रोव्हर पाठवलं आहे.

मानवाला मंगळावर कसं पाठवता येईल यासंदर्भातील संशोधन पर्सिव्हिअरन्स मोहिमेच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मंगळाच्या वातावरणामध्ये ऑक्सिजन निर्मितीसाठी काय करता येईल यासंदर्भातही संशोधन या मोहिमेमध्ये केलं जाणार आहे. पर्सिव्हिअरन्स रोव्हरवर मॉक्सील नावाचे एक यंत्र बसवण्यात आलं असून त्याच्या माध्यमातून मंगळाच्या वातावरणामध्ये ऑक्सिजन निर्माण करता येईल का यासंदर्भातील चाचणी करण्यात येणार आहे. ‘पर्सिव्हियरन्स रोव्हर पुढील काही वर्ष मंगळावर राहणार आहे. या काळात जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा खुणांचा शोध रोव्हर घेणार असून, मंगळावरून नमुने घेऊन पृथ्वीवर परत येईल. ज्यामुळे भविष्यात माणसाचा मंगळावर जाण्याचा मार्ग खुला होईल,’ असं नासानं म्हटलं आहे.

ग्रेटाने काही आठवड्यापूर्वी भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देताना एक टूल किट शेअर केलं होतं. याप्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूल किट एडीट आणि शेअर केल्याच्या आरोपाअंतर्गत बंगळुरुमधील पर्यावरण कार्यकर्ती दिशी रविला अटक करण्यात आळी आहे.