वॉशिंग्टन : पर्यावरणविषयक संकट टाळण्यासाठी खरीखुरी कृती करावी अशी विनंती लोकप्रतिनिधींना करत किशोरवयीन पर्यावरणविषयक कार्यकर्ती ग्रेटा थुंबर्ग हिने हवामान बदलाचा तिचा लढा अमेरिकी काँग्रेसमध्ये नेला आहे. या लोकप्रतिनिधींपैकी अनेकजण जागतिक हवामान बदलाबाबत संशय घेणारे आहेत.

स्वीडनच्या १६ वर्षांच्या या कार्यकर्तीला अनेकांची साथ मिळाली आहे. हवामान बदलाबाबतच्या निष्क्रियतेमुळे उद्भवलेल्या अनिश्चितेमुळे तरुण पिढीला आजच्या राजकीय नेत्यांच्या हेतूंबाबत प्रश्न विचारणे भाग पडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवडय़ात वॉशिंग्टनला पोहचलेल्या ग्रेटाचे वेळापत्रक व्यस्त होते. व्हाईट हाऊससमोर निदर्शने, दक्षिण अमेरिकेतील स्थानिक नेत्यांना भेटणे आणि पर्यावरणाबाबतच्या निष्क्रियतेबद्दल सरकारवर खटला दाखल करण्यासाठी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्यांवर गोळा होणे अशा कार्यक्रमांचा त्यात समावेश होता. सोमवारी ग्रेटाने माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चर्चा केली.तिने अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा पुरस्कारही स्वीकारला. बुधवारी दोन सभागृह समित्यांच्या संयुक्त सुनावणीला उपस्थित राहिली असता तिचा संदेश नम्र, पण रोखठोक होता. ‘तुम्ही माझे ऐकावे असे मला वाटत नाही, तर शास्त्रज्ञांचे ऐकावे अशी माझी इच्छा आहे’, असे ’ती म्हणाली.