शेतकरी आंदोलनासंदर्भातील ग्रेटा थनबर्ग हिचे ट्वीट

स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिने जारी केलेल्या टूलकिटचा खलिस्तानशी संबंध असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्याबाबत भाष्य केले आहे. या टूलकिटमधून अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर जे भाष्य केले त्यावर परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने का प्रतिक्रिया व्यक्त केली ते कळू शकेल, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

या टूलकिटमधून अनेक बाबी उघड झाल्या आहेत, त्यामधून आणखी काय उघड होते त्याची प्रतीक्षा करावी लागेल. ज्या गोष्टींची सेलिब्रिटींना जाणीवच नाही त्याबाबत त्यांनी भाष्य केल्याने परराष्ट्र मंत्रालयास तातडीने का प्रतिक्रिया द्यावी लागली ते कळू शकण्यास मदत होईल, असे जयशंकर यांनी सांगितल्याची एक क्लीप एका वृत्तवाहिनीने पोस्ट केली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत ज्यांनी टूलकिट तयार केले त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुरुवारी देशद्रोह, गुन्हेगारी स्वरूपाचा कट आणि तिरस्काराला प्रोत्साहन असे आरोप असलेला एफआयआर नोंदविला आहे. याच टूलकिटबाबत थनबर्गचा संदेश होता.  थनबर्ग हिने बुधवारी मूळ ट्वीट काढून टाकले, मात्र बुधवारी रात्रीच दुसरे टूलकिट ट्वीट केले.  थनबर्गसह पॉप आयकॉन रिहाना आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत मत व्यक्त केल्याने परराष्ट्र मंत्रालयाने या सेलिब्रिटींवर टीका केली.

संघटना खलिस्तान समर्थक असल्याचा दावा

शेतकऱ्यांच्या आंदोलनातील घटनाक्रम (६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर मोर्चाच्या वेळी घडलेला हिंसाचारासह) हा टूलकिटमध्ये जी कृती योजना जारी करण्यात आली होती तिच्याशी मिळतीजुळती आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ज्या टूलकिटबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते खलिस्तानी समर्थक संघटना पोएटिक जस्टीस फाऊण्डेशनने तयार केले आहे, असे विशेष पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) प्रवीर रंजन यांनी म्हटले आहे.