अमेरिकेतील लोवा येथील एका सुपरमार्केटमध्ये साफसफाईदरम्यान मोठे कुलर्स आणि कपाटे हलवल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. त्यांना अनेक वर्ष न लवलेल्या या मोठ्या कुलर्समागे एक मृतदेह अढळला. जानेवारी महिन्यामध्ये अढळलेला हा मृतदेह हा दहा वर्षांपूर्वी नो फ्रिल्स सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा असल्याचे डीएनए चाचणीमधून उघड झाले आहे.

२००९ साली २८ नोव्हेंबर रोजी हरवलेल्या लेरी एली मुर्लो मॉनकॅडा या कर्मचाऱ्याचा हा मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे. मागील दहा वर्षांपासून हा मृतदेह याच सुपरमार्केटमधून पडून होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लेरीच्या पालकांच्या डीएनएशी या मृतदेहाचा डीएनए जुळवून पाहिला असता हा मृतदेह लेरीचा असल्याचे सिद्ध झाले आहे. लेरी ज्यावेळी बेपत्ता झाला त्यावेळी त्याने घातलेल्या कपड्यांचे वर्णन या मृतदेहावर असणाऱ्या कपड्यांशी जुळत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. घरामध्ये भांडण झाल्याने लेरी घरातून पळून गेल्यानंतर त्याच्या पालकांनी दहा वर्षापूर्वी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती. लेरी जेव्हा घरातून पळून गेला तेव्हा तो विक्षिप्तासारखा वागायचा. त्यावेळी तो घेत असलेल्या औषधांमुळे त्याच्या वागणुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी त्यावेळी लेरीचा शोध घेतला असता त्यांना त्याला शोधण्यात अपयश आले. अखेर दहा वर्षांनी थेट लेरीचा मृतदेहच सुपरमार्केटच्या कर्मचाऱ्यांच्या हाती लागला.

घरुन पळून आलेला लेरी सुपरमार्केटमधील कुलर्सवर लपून बसला. या ठिकाणी सुपरमार्केटमधले सामन ठेवले जायचे. कधीकधी ही जागा सुपरमार्केटमधील कर्मचारी लपून आराम करण्यासाठी वापरली जायची असेही पोलिसांनी सांगितले. लपून बसण्याच्या प्रयत्नात लेरी कुलर आणि भिंतीच्यामध्ये असणाऱ्या १८ इंचाच्या मोकळ्या जागेमध्ये पडला आणि तिथेच अडकला. कुलरच्या आवाजामुळे लेरीने मदतीसाठी मारलेल्या हाका कोणालाही ऐकू गेल्या नसतील अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे.