लग्न कार्यात कधी, कुठे, कोणतं विघ्न येईल सांगता येत नाही. त्यामुळे घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून, असं म्हटलं जात असावं. अशीच लग्नाची एक घटना समोर आली आहे. लग्नात मटण करी नसल्यानं संतापलेल्या नवरदेवाने लग्नच मोडल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही, तर नवरदेवानं दुसऱ्याचं मुलीशी लग्न करून संसार थाटला.

ओडिशातील जजपूर जिल्ह्यात असलेल्या सुकिंदा तालुक्यात ही घटना घडली आहे. लग्नासाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाच्या मेन्यूमध्ये मटणाच्या भाजीचा समावेश केलेला नसल्याने नवरदेव नाराज झाला. या नाराजीचा शेवट लग्न मोडण्यातच झाला. रमाकांत पत्रा असं नवरदेवाचं नाव असून, तो क्योंझर जिल्ह्यातील रेबनपालस्पल येथील रहिवाशी आहे.

नवरदेवाकडची मंडळी लग्नासाठी बांधगाव येथे आली. लग्न लागल्यानंतर पारंपरिक विधी पार पडले, त्यानंतर नवरदेवासह सर्वजण जेवणाच्या हॉलमध्ये गेले. यावेळी नवरदेवाकडच्या मंडळींनी मटण करी ऑर्डर केली. दरम्यान, जेवणात मटणाच्या भाजीचा समावेश न केल्यानं नवरदेव आणि नवरीकडच्या कुटुंबात वाद सुरू झाला.

हा वाद शिगेला जाऊन परिस्थिती तणावपूर्ण बनली. लग्नात मटणाची भाजी केली जाणार नसल्याचं लक्षात आल्यानंतर नवरदेवाने रागाच्या भरात लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वऱ्हाडी मंडळी तिथून निघून गंधपाल गावातील नातेवाईकांकडे पोहोचले. तिथे नवरदेवाने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आणि नवरीसह वऱ्हाडी घरी परतले.