22 April 2019

News Flash

वरातीच्या नाचण्यामुळे पूल कोसळला, नवरदेव पडला नाल्यात

लग्नाच्या वरातीत नाचगाणे सुरु असताना अचानक पूल कोसळल्यामुळे नवरदेवासह १५ जण नाल्यात पडले. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

लग्नाच्या वरातीत नाचगाणे सुरु असताना अचानक पूल कोसळल्यामुळे नवरदेवासह १५ जण नाल्यात पडले. नोएडाच्या सेक्टर ५२ मध्ये होशियारपूर गावात शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. नाल्यावर बांधण्यात आलेल्या या पूलावर नवरदेवासह वरातीत सहभागी झालेले सर्वजण नाचत असताना अचानक हा पूल कोसळला.

जवळपास १० मिनिटे पूलावर नाचगाणे सुरु होते असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हा पूल ऑलिव्ह गार्डन बॅनक्वेट हॉलला थेट जोडला गेला आहे. होशियारपूर गावात नाल्यावर बांधण्यात आलेला पूल कोसळल्याचे आम्हाला ९.३० वाजता समजले. दहापेक्षा जास्त लोक नाल्यात पडले होते. आठ वर्षाखालील दोन मुले जखमी झाली. त्यांना लगेच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुठलाही गुन्हा नोंदवलेला नाही असे सेक्टर २४ पोलीस स्थानकातील अधिकारी मथिलेश उपाध्याय यांनी सांगितले.

अमित यादव असे नवरदेवाचे नाव असून गाझियाबाद इंदिरापूरम येथे राहणारा अमित पेशाने व्यावसायिक आहे. वधूचे वडिल फुल कुमार यांनी हा हॉल बुक केला होता. वरातीचे स्वागत करण्यासाठी वधूचे कुटुंबिय पूलाच्या दुसऱ्या टोकाला थांबले होते असे या घटनेचा साक्षीदार असलेल्या सुरक्षा रक्षकाने सांगितले. १५ जण दहा मिनिटे या पूलावर नाचत होते. यामध्ये नवरदेवही होता असे या सुरक्षा रक्षकाने सांगितले.

पूल कोसळणे ही दुर्देवी घटना आहे. १५ वर्षांपासून आम्ही या व्यवसायात आहोत. पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. आम्ही दोन्ही कुटुंबाची माफी मागून मुलीच्या वडिलांनी भरलेले सर्व पैसे त्यांना परत केले असे ऑलिव्ह गार्डन हॉलचे मालक ओ.पी.शर्मा यांनी सांगितले.

 

First Published on February 11, 2019 8:20 am

Web Title: groom falls in drain after bridge collapses due to baraat dance