तुम्ही ‘हम आप के हैं कौन’ बघितला आहे का? या चित्रपटामध्ये मोहनीश बहलचे काका म्हणजेच आलोकनाथ आणि मोहनीशची होणारी पत्नी म्हणजेच रेणुका शहाणेच्या आईची भूमिका साकारणाऱ्या रिमा लागू यांचे कॉलेज जीवनात एकमेकांवर प्रेम असल्याचं दाखवलं आहे. यावरुनच चित्रपटामध्ये एक संपूर्ण गाणंही आहे. अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने हा विषय चित्रपटात हाताळण्यात आला आहे. मात्र सुरतमध्ये हे असं प्रत्यक्षात घडलं आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे वरपिता आणि वधूची आई पळून गेले आहेत.

सूरत शहरामध्येच राहाणाऱ्या तरुण आणि तरुणीचे लग्न जुळले. हे लग्न ठरल्यानंतर मुलाचे वडील आणि मुलीची आई हे कॉलेजच्या काळात एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दोन्ही कुटुंबांना समजले. मुलांच्या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा भेट झालेले हे दोघे चक्क घर सोडून पळून गेले आहेत. त्यामुळेच आता दोन्ही कुटुंबांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ठरवलेले तरुण तरुणीचे लग्न आता मोडल्यात जमा आहे.

कटारगम येथील घरातून ४८ वर्षीय वरपिता आणि नवसारी येथील घरातून मुलीची ४६ वर्षीय आई पळून गेले आहेत. मागील दहा दिवसांपासून हे दोघेही बेपत्ता आहेत. हे एकमेकांबरोबर पळून गेल्याची शक्यता दोन्ही कुटुबांनी व्यक्त केली आहे. या दोघांच्या पळून जाण्याने दोन्ही कुटुंबाची चांगलीच पंचाईत झाली असून त्यांनी दोघे बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली आहे.

जवळजवळ वर्षभरापूर्वी या तरुण आणि तरुणीचा साखरपुडा झाला. त्यानंतर मागील वर्षभरापासून हे दोघे लग्नाची तयारी करत होते. दोघेही एकाच समाजाचे असल्याने सर्व परंपरा सारख्याच असल्याने मोठ्या उत्साहाने लग्नाची तयारी सुरु होती. मात्र लग्न अगदी एका महिन्यावर आले असतानाच मुलाचे वडील आणि मुलीची आई एकमेकांबरोबर पळून गेल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नवरदेवाचे वडील महेश (बदललेले नाव) हे कापडाचे व्यापारी आहेत. ते १० जानेवारीपासून बेपत्ता झाले आहेत. राकेश हे नवरीचे आई रेश्मा (बदललेले नाव) यांना लहानपणापासूनच ओळखत होते. लहानपणी ते दोघे एकमेकांचे शेजारी होते. “कटारगम येथील सोसायटीमध्ये महेश आणि रेश्मा यांची कुटुंबे शेजारीच रहायची. त्यांच्या काही मित्रांनी या दोघांमध्ये तरुणपणी प्रेमसंबंध होते असंही आम्हाला सांगितलं आहे. मात्र रेश्माचे लग्न दुसरीकडे ठरल्यानंतर हे दोघे वेगळे झाले होते,” अशी माहिती या कुटुंबियांच्या मित्रांपैकी एकाने दिली आहे. रेश्मा यांचे लग्न भावनगर जिल्ह्यातील हिरे कारागिराशी झाले होते. नंतर त्यांनी शेअर बाजारामध्ये ब्रोकरचे काम करण्यास सुरुवात केली. आता इतक्या वर्षांनंतर ते ही मुलांच्या ऐन लग्नसराईमध्ये नवऱ्याचे वडील आणि नवरीची आई पळून गेल्याने स्थानिकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे.