दिल्ली-गुरुग्राम रस्त्यावर टोल भरताना, ५ रुपयाचं नाण जमिनीवर पडल्याच्या रागातून दोन टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात हरियाणातील गुरुग्राम येथील खेरकी दौला टोल नाक्याचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी ही घटना घडल्याचं कळतंय. पोलिसांनी याप्रकरणी हल्ला करणाऱ्या दोघांना अटक केली असून, जखमी कर्मचाऱ्यांवर जवळील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोल नाक्यावरील १४ नंबर लेनमध्ये आरोपी आपल्या स्विफ्ट गाडीमधून जात होते. टोल भरल्यानंतर सुट्टे-पैसे परत देत असताना पाच रुपयांचं नाणं जमिनीवर पडलं. यावेळी पाठीमागे गाड्यांची रांग वाढत असल्याचं पाहून टोल कर्मचाऱ्याने गाडीतील व्यक्तीला पटापट पुढे निघण्यास सांगितलं. गाडीत बसलेल्या व्यक्तीने टोल कर्मचाऱ्याला पाच रुपयाचं नाण उचलून द्यायला सांगितलं, यावरुन दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. गाडीत बसलेल्या व्यक्तीने संतापून आपल्याजवळील चाकूने टोल मॅनेजरवर हल्ला केला.

यावेळी टोल नाक्यावरील एक कर्मचारी या भांडणात मध्ये पडल्यावर गाडीतील व्यक्तीने त्याच्यावरही हल्ला केला. या प्रकरणानंतर दोन्ही आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र टोल नाक्याजवळ तैनात असलेल्या पोलिसांनी वेळेतच त्यांना अटक केली आहे. निखील आणि रोहित अशी या आरोपींची नावं असून ते हरियाणातील बल्लभगढचे रहिवासी आहेत. दरम्यान जखमी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय.